औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा अॅड. देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ 21 सप्टेंबर 2019 रोजी संपणार आहे. त्यापुढे अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजप सदस्यात आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 62 गटांपैकी भाजपने सर्वाधिक 23 गटामधून विजय संपादन केला होता. भाजपसोबत पारंपरिक युती असलेल्या शिवसेनेने 18 गटातून विजय मिळवला होता. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेसच्या 16 सदस्यांना सोबत घेऊन अध्यक्षपद स्वत:कडे राखले. तत्पूर्वी शिवसेनेकडे अडीच वर्षे तर काँग्रेसकडे पुढील अडीच वर्षे अध्यक्षपद देण्याचे ठरले होते.
मध्यंतरी राज्यपातळीवर शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने युती संपुष्टात आली होती;परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपची पुन्हा युती झाली. महाराष्ट्रात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेने काँग्रेससोबत युती करून सत्ता स्थापन केली आहे तेथे काँग्रेससोबतची युती तोडावी व भाजपसोबत हातमिळवणी करावी, अशी घोषणा भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. आता शिवसेनेच्या विद्यमान जि.प. अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 21 सप्टेंबर 2019 रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना यांच्या युतीधर्मानुसार जि.प. चे अध्यक्षपद भाजप सदस्यास देण्यात यावे, असे भाजप सदस्य बोलत आहेत. अध्यक्षपद महिलेला देणार असेल, तर अनुराधा चव्हाण व पुरुष सदस्यांना देणार असाल तर मधुकर वालतुरे यांना देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या जि.प. सदस्यांकडून होत आहे.